तापमान घटले, तरी घामाच्या धारा! जळगावात मान्सून कधी धडकणार? तारीख आली समोर!

मे 22, 2026 10:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२६ । जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून काहीसे ढगाळ वातावरणामुळे तापमानात किंचित घट झाली असली, तरी असह्य उकाड्यामुळे जळगावकर प्रचंड हैराण झाले आहेत. तापमानात २ अंशांपर्यंत घसरूनही वातावरणातील आर्द्रता वाढल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. यामुळे जळगावकर आता मान्सून पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, जिल्ह्यात १५ ते २१ जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

rain

गेल्या तीन दिवसांपासून जळगावच्या तापमानात दोन अंशांपर्यंतची घसरण नोंदवली गेली आहे. सोमवारी (१८ मे) जळगावचे तापमान ४४.४ इतके होते. यानंतर सलग तिसऱ्या दिवशी तापमानत घसरण दिसून आली. काल गुरुवारी जळगावचे तापमान ४२ अंशांवर स्थिरावले होते. तापमान घटले असले तरी सूर्योदयानंतर अवघ्या काही तासांतच, म्हणजेच सकाळी ८ वाजल्यापासूनच नागरिकांना उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागतात. दुपारच्या वेळी हवेतील आर्द्रता (ह्युमिडिटी) प्रचंड वाढत असल्यामुळे नागरिकांना कडक उन्हापेक्षाही असह्य उष्णता आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

जळगाव जिल्ह्यात ‘या’ तारखेला धडकणार मान्सून?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, साधारणपणे १ जूनच्या सुमारास मान्सून केरळमध्ये दाखल होतो, पण यंदा तो थोडा लवकर म्हणजेच २६ मे २०२६ पर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.यानंतर त्याचा देशभरातील प्रवास सुरू होईल. १० ते १२ जून दरम्यान तो मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर पोहोचेल अशी शक्यता आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर पुढील ३ ते ४ दिवसांत उत्तर महाराष्ट्रात (जळगाव, धुळे, नंदुरबार) रीतसर आगमन करेल. जळगाव जिल्ह्यात १५ ते २१ जून दरम्यान धडकण्याची दाट शक्यता आहे.

जूनच्या उत्तरार्धात (महिन्याच्या शेवटी) जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र, एकंदरीत पाहता जून महिन्यातील पावसाचे एकूण प्रमाण सरासरीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे. जुलै महिन्यात मात्र पाऊस जोर धरण्याची शक्यता असून, अधूनमधून पावसाच्या चांगल्या सरी बरसतील. यामुळे जूनमधील तूट भरून निघेल आणि नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळू शकेल.

सध्या जळगावकरांना तापमानातील घसरणीनंतरही ‘मे हिट’पेक्षाही भयानक उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. आता सर्वांचे डोळे १५ जूननंतर येणाऱ्या मान्सूनच्या पावसाकडे लागले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now