जळगाव लाईव्ह न्यूज । 8 फेब्रुवारी 2024 । जळगाव जिल्ह्यात एकीकडे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून गंभीर गुन्हेगारांवर एमपीडीएसह हद्दपारीच्या कारवाईचे सत्र सुरु आहे. मात्र दुसरीकडे गुन्हेगारी डोकवर काढताना दिसत आहे. चाळीसगावमध्ये एका माजी नगरसेवकावर भर दिवसा गोळीबार केल्याची घटना ताजी असताना आता जळगाव शहरातील आणखी एक गुन्हेगारीची घटना समोर आली आहे.

जळगावात दोन मद्यपी दुचाकीस्वारांच्या गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही हाणामारी आरोपींच्या पुरता मर्यादीत राहिली नाही. कारण या दोन्ही गटाच्या आरोपींनी तिथे उपस्थित असलेल्या परिसरातील नागरिकांनादेखील लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच हॉटेल नैवेधमध्ये शिरून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवार, ७ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास काव्यरत्नावली चौकात घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.

आरोपींच्या गटांकडून परिसरातील हॉटेल मालकासह 17 ते 18 नागरिकांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घटनेमुळे जळगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.







