जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावमधील नामांकित ‘प्रीती अँड जय सलोन’चे संचालक आणि प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जयविजय गोविंद निकम यांनी हेअर ड्रेसिंग क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर जळगावचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. प्रतिष्ठित ‘मॅट्रिक्स’ (Matrix) कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मॅट्रिक्स हेअर ट्रान्सफॉर्मर्स’ या स्पर्धेत त्यांची भारतातून पहिल्या १० विजेत्यांमध्ये निवड झाली आहे.

संपूर्ण नाशिक विभागातून हा बहुमान मिळवणारे ते एकमेव हेअर ड्रेसर ठरले असून, त्यांची अंतिम फेरीसाठी बँकॉक येथे निवड झाली आहे.

१ लाख स्पर्धकांमधून मारली बाजी
या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून तब्बल १ लाख हेअर ड्रेसर्सनी सहभाग घेतला होता. या स्पर्धकांचे हेअर कट्स, कलरिंग, हायलाईट्स, कलर मेल्टिंग आणि स्टायलिंग यांसारख्या विविध कौशल्यांवर आधारित डिजिटल सादरीकरण ऑनलाईन माध्यमातून तपासले गेले. पहिल्या फेरीत देशातून १५० जणांची निवड करण्यात आली. या १५० विजेत्यांमधून अंतिम फेरीसाठी ‘मेल हेअर ड्रेसिंग’ (Male Hair Dressing) कॅटेगरीत जयविजय निकम यांनी देशातील अव्वल १० जणांमध्ये स्थान मिळवून जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
कला आणि डिजिटल प्रतिसादाच्या जोरावर यश
या स्पर्धेतील निवड केवळ हेअर ड्रेसिंगच्या कलेवरच नाही, तर डिजिटल माध्यमांवरील प्रतिसादावरही आधारित होती. जयविजय यांनी केलेल्या हेअर कट्स आणि स्टायलिंगला ग्राहकांनी आणि मित्रांनी सोशल मीडियावर दिलेले लाईक्स, व्ह्यूज आणि कमेंट्स परीक्षकांना (Judges) प्रचंड आवडल्या. त्यांच्या या दर्जेदार कलाकृतीला इंटरनेटवर मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे जजेसने त्यांची टॉप १० मध्ये निवड केली.
अंतिम फेरी बँकॉक येथे होणार
देशभरातून निवडण्यात आलेल्या या अव्वल हेअर ड्रेसर्सची अंतिम फेरी आता थायलंडमधील बँकॉक येथे पार पडणार आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांकडून (International Artists) त्यांना विशेष प्रशिक्षण व मास्टर क्लास दिले जातील, ज्याचा संपूर्ण खर्च मॅट्रिक्स कंपनी करणार आहे. या अंतिम फेरीतून या वर्षाच्या ‘एमएचटी’ (MHT 2026) स्पर्धेचा अंतिम महाविजेता निवडला जाणार आहे.
या यशाबद्दल बोलताना जयविजय निकम म्हणाले, “माझ्यावर प्रेम करणारे माझे ग्राहक, मित्र आणि कुटुंबियांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या कमेंट्स आणि लाईक्समुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. तसेच मॅट्रिक्स टीमने आमच्यासारख्या हेअर ड्रेसर्ससाठी इतका मोठा आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि आमच्या कलेवर विश्वास ठेवला, याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. बँकॉक येथील आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन मी माझ्या जळगावचे नाव नक्कीच आणखी मोठे करेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”
जयविजय निकम यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल जळगाव जिल्ह्यातील सलोन व्यावसायिक, मित्रपरिवार आणि ग्राहकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.











