जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२५ । गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसतेय. ट्रम्प सरकार अवलंबत असलेल्या धोरणाचे आंतरराष्ट्रीय जगतावर पडसाद उमटत असल्यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात तेजी आली आहे.

सध्या लग्न सराईचे दिवस असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. यातच सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर असल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. मंगळवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या प्रती तोळ्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ होऊन सोने ८३६०० (जीएसटीसह ८६१०८) या सर्वकालीन उच्चांकी पातळीवर पोहचले.
दुसरीकडे चांदीचा दर देखील १ हजार रुपयांनी वाढला आहे. यामुळे आता चांदीचे दर 97 हजार रुपयांवर गेले आहेत. सुवर्णनगरीत सोने पुढील आठवड्यात आणखी दीड हजाराने महागण्याचे संकेत असून 90 हजारांचा आकडा पार करेल अशी शक्यता सुवर्ण व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.
मागील एक आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचे दरात २१०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत १९०० रुपयांनी वाढ झाली आहे. बजेट घोषित केल्यानंतर जळगावच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅमची किंमत २०० रुपयांनी वाढून ८२९०० रुपयावर होते.