जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२६ । जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम स्थानिक सराफा बाजारावर दिसून येत असून जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. यामुळे सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन डॉलर मजबूत होत असल्याने आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीबाबत अनिश्चितता कायम असल्याने सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे जागतिक बाजारासह देशांतर्गत बाजारातही मौल्यवान धातूंच्या दरात घसरण झाली आहे.

जळगावातील सराफा बाजारात सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ५१ हजार ९२५ रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र त्यानंतर दोन दिवसांत सातत्याने झालेल्या घसरणीमुळे बुधवारी हा दर १ लाख ४७ हजार ८०५ रुपयांवर आला. अवघ्या दोन दिवसांत सोन्याच्या किमतीत तब्बल ४ हजार १२० रुपयांची घसरण नोंदविण्यात आली आहे.
चांदीच्या दरातही मोठी नरमाई दिसून आली. सोमवारी प्रति किलो चांदीचा दर २ लाख ४९ हजार २६० रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी झालेल्या घसरणीनंतर चांदीचा भाव २ लाख ३३ हजार ८१० रुपयांवर आला आहे. दोन दिवसांत चांदी तब्बल १५ हजार ४५० रुपयांनी स्वस्त झाली आहे.










