जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२५ । इस्त्रायल- इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे सोने चांदीच्या दरात वाढ झाली होती. चांदीने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. मात्र शुक्रवारी सोन्यासह चांदी दरात घसरण झाली आहे.

जळगावच्या सुवर्णबाजारात शुक्रवारी सोने दरात प्रति तोळा ६०० रुपयांची घसरण झाली. यामुळे आता २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ९८९०० रुपये प्रति प्रति तोळ्यावर पोहोचले आहे, तर चांदी दरात तब्बल चार हजार रुपयाची घसरण झाली. यांनतर चांदीचा प्रति किलोचा दर आता १०७००० रुपयावर पोहोचला आहे. दरम्यान, युद्धामुळे वाढलेल्या दरांना कुठलाही आधार नसल्याने दरात घसरण झाली असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

या आठवड्यात सोन्यापेक्षा चांदी दरात मोठी उसळी दिसून आली. चांदीचा दर १ लाख ११ हजार २४० रुपयांवर पोहोचले आहेत. जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात चांदीने पहिल्यांदाच १ लाख ११ हजारांचा आकडा पार करत नव्या विक्रमाला गवसणी घातली. मात्र शुक्रवारी एकाच दिवसात चांदी दरात मोठी घसरण झाली. सध्या सोने आणि चांदी दरात घसरण झाली असली तरी दोन्ही धातूंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरच आहे.
सोन्याचे दर गगनाला भिडले असल्याने ग्राहक २४-२२ कॅरेटवरून ग्राहक आता १८ कॅरेटपर्यंतच्या दागिन्यांची विचारणा करत आहेत. कारण २२ कॅरेटपेक्षा १८ कॅरेट दागिन्यांच्या किमतीत सुमारे २५ टक्के तफावत असल्याने त्याला मागणी येत आहे.







