जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२५ । सोने खरेदीदारांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले. जळगाव सराफ बाजारात मागच्या दोन दिवसात सोने दरात ७०० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदी दरात जवळपास २ हजार रुपयांची घसरण झाली. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र अद्यापही सोने चांदीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे.

या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने दरात ४०० रुपयांची वाढ होऊन प्रति तोळा ९८,७०० रुपयावर होता. तर मंगळवार सोन्याचा दर ४०० रुपयांनी तर बुधवारी ३०० रुपयांनी घसरण झाल्याने ९७९०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. तर आज गुरुवारी सोने दरात किंचित प्रति तोळा ५० रुपयांची वाढ दिसून येतेय.

दुसरीकडे दोन दिवसात चांदी दरात २००० हजार रुपयापर्यंतची घसरण दिसून येतेय. सध्या एक किलो चांदीचा दर ११३००० रुपये इतका आहे. आज चांदी दरात कोणताही बदल झालेला दिसून आला नाही. चांदी दर स्थिर आहे.
दरम्यान, मागच्या काही दिवसात सोन्याच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे ग्राहकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली आहे. दर वाढल्यानंतर सोने मोडून पैसे करणारे मात्र, घटत असल्याचे चित्र जळगावच्या सराफ बाजारातील व्यावसायिक अनुभवत आहे. सोन्याचे दर ८५ ते ८८ हजार रुपये तोळा असताना मोडीचे प्रमाण विक्रीच्या ४० टक्के एवढे होते. ते आता निम्म्याने घसरून २० टक्क्यांपर्यंत खाली आले असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.












