जळगावकरांसाठी गुडन्यूज : गिरणेचा जलसाठा 52% वर, वाघूर धरणातही मुबलक पाणीसाठा..

जुलै 15, 2025 11:42 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२५ । जळगावकरांसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. अर्धा जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणात आज अखेर (दि. १५) ५२.१५ टक्के साठा झाला आहे. विशेष गेल्या वर्षी जुलैच्या तुलनेत ४० टक्के अधिक साठा झाल्याने पाणी योजनांचा प्रश्न मिटणार आहे. मात्र, धरण १०० टक्के भरण्यासाठी गिरणा, मोसम पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

girna dam

गिरणा व हरणबारी या प्रमुख धरणांसह उपनद्या व त्यांच्या पाणलोट क्षेत्रात होणारा पाऊस हेच गिरणा धरणाचे जलस्रोत आहेत. २४ जूनला धरणातील आरक्षित सर्व आवर्तने संपली आहेत. यानंतर धरणात २६.५१ टक्के म्हणजेच ४९०५ दलघफू जलसाठा शिल्लक होता.

जूनच्या प्रारंभी झालेला अवकाळी व नंतरच्या काळातील बेमोसमी पावसामुळे धरणात निर्माण झालेली तूट मोठ्या प्रमाणात भरून निघाली. मोसमी पावसाआधीच धरणातील साठ्यात जलदवाढ झाली. १ जुलैला हाच जलसाठा ३४.३९% म्हणचेच ६५८८ दलघफू इतका वाढला आहे. मात्र मागच्या काही दिवसात पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरणात मोठी वाढ झाली. सध्या धरणात ५२.१५ जलसाठा झाला आहे.

या योजनांचा जीवनस्रोत

गिरणा धरण हे नांदगाव तालुक्यात असताना देखील जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांना व अनेक शहरांना पाणीपुरवठा केला जातो. गिरणा धरणावर जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एंडोलसारख्या तालुक्यांतील १५४ गावे व २१८ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. मालेगाव महापालिका क्षेत्र व दहिवासा २६ गाव पाणीपुरवठा योजना तसेच नांदगाव सर ५६ खेडी योजनांसाठी याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. चाळीसगाव एमआयडीसीला गिरणा धरणातून आवर्तने दिली जातात.

वाघूर धरणात मुबलक पाणीसाठा

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणार धरणात यंदा मुबलक जलसाठा शिल्लक आहे. सध्या आजअखेर वाघूर धरणात ६५.६८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी वाघूर धरणात ५३ टक्के जलसाठा होता. यंदा जुलैच्या पंधरवड्यातच धरणात मुबलक जलसाठा आहे. दरम्यान अद्यापही पावसाचे दोन-अडीच महिने बाकी आहे. यात पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यास वाघूर धरण शंभरी गाठेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now