जळगाव जिल्ह्यात चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात पोलीस दलात महत्त्वपूर्ण बदल घडून आला आहे, ज्यामध्ये ४ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या बदल्यांबाबत आदेश जारी केले आहेत.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनात पाईप चोरी प्रकरणावरून आ. राजूमामा भोळे यांनी पोलिसांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी असा आरोप केला होता की, पाईपलाईन चोरी प्रकरणात पोलिसांनी मुख्य संशयिताचे नाव चुकवून त्यांना पाठीशी घातले होते. या प्रकरणामुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या बदलीच्या हालचाली सुरू होत्या. सोमवारी सायंकाळी महेश शर्मा यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली, तर त्यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोनि संजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील चार पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदलीचे आदेश काढले आहेत. जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या रिक्त जागी संजय गायकवाड यांची बदली करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी नीलेश गायकवाड यांची एरंडोल येथे तर एरंडोलचे प्रभारी सतीश गोराडे यांची सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून बदली करण्यात आली. सतीश गोराडे यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त पदभारही देण्यात आला आहे.