जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२५ । गत सप्टेंबर महिन्यात जळगाव जिल्ह्यात अतिपाऊस झाल्याने शेती पिकांचं मोठं नुकसान झालाय. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासूनच मात्र पावसाने उसंती घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र एकीकडे मान्सून परतला असला तरी, आगामी आठवड्यात ऐन दिवाळीच्या काळात जिल्ह्यात काही अंशी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली.

मॉन्सूनने महाराष्ट्रातील काही भागातून काढता पाय घेतला आहे. परतीच्या पावसाने उसंती घेतल्याने दुसरीकडे जळगाव जिल्ह्याचे हवामान सध्या कोरडे झाले आहे. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्याने ऑक्टोबर महिन्यातील उकाडा कमी झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत रात्रीच्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. याचसोबत रात्रीच्या तापमानातही मोठी घट नोंदवली जात आहे.गेल्या आठवड्याभरात रात्रीच्या तापमानात ८ अंशांनी घट झाली असून, रविवारी जळगाव शहरातील रात्रीचा पारा १६ अंशांपर्यंत खाली घसरला आहे. यामुळे जळगावकरांना रात्री आणि सकाळी गुलाबी थंडीची चाहूल लागली.

परंतु यातच हवामान खात्याने आगामी आठवड्यात ऐन दिवाळीच्या काळात जिल्ह्यात काही अंशी पावसाची शक्यता वर्तवली आहे. १६ ऑक्टोबरनंतर जिल्ह्यात काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकते. तसेच मध्यम ते हलका पाऊस होऊ शकतो. यामुळे दिवाळीच्या उत्साहावर आणि खरेदीवर परिणाम होऊ शकतो.
आगामी पाच असं राहणार हवामान?
दिनांक.. रात्रीचा पारा.. वातावरणाची स्थिती
१३ ऑक्टोबर : तापमान १६ अंश… कोरडे वातावरण राहणार
१४ ऑक्टोबर : तापमान १७ अंश… कोरडे वातावरण राहणार
१५ ऑक्टोबर : तापमान १७ अंश… काही अंशी ढगाळ
१६ ऑक्टोबर : तापमान १८ अंश… पावसाची शक्यता
१७ ऑक्टोबर : तापमान १८ अंश… मध्यम ते हलका पाऊस







