जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२५ । उत्तरेतील शीत लहरींमुळे मध्य भारतासह महाराष्ट्रातील किमान तापमानासोबतच कमाल तापमानातही लक्षणीय घट सुरूच आहे. विशेष खान्देशातील धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात किमान तापमानात मोठी घट झाली आहे. दरम्यान जळगावात सलग तिसऱ्या दिवशी तापमानात घट झाली असून रविवारी १०.५ अंश सेल्सिअस तापमान होते. हे या हंगामातील आत्तापर्यंतचे सर्वात कमी तापमान ठरले आहे. यामुळे जळगावमध्येही चांगलाच गारठा जाणवत आहे

गत २४ तासांच्या तुलनेत रविवारीही राज्यात सर्वात कमी तापमान धुळे येथे ८.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. त्याखालोखाल जेऊरमध्ये १०, जळगावमध्ये १०.५ आणि परभणीत १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यात कोरडे हवामान कायम राहून किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढू शकतो.

जळगावात थंडीचा कडाका वाढला
जळगाव जिल्यात मागच्या तीन दिवसापासून किमान तापमानात मोठी घट झाल्याचं दिसून आले. परिणामी शहरासह जिल्ह्यात थंडी वाढली आहे. तर पुढील तीन ते चार दिवस किमान तापमान आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रविवारी १०.५ अंश सेल्सिअस तापमान होते. या हंगामातील हे आत्तापर्यंतचे सर्वात कमी तापमान ठरले आहे.
सकाळ आणि रात्रीच्या वेळेस हुडहुडी भरणारी थंडी जळगावकरांना जाणवत आहे. या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत..सकाळी फिरताना अंगात उबदार कपडे घालूनच नागरिक घराबाहेर पडताना दिसते आहे..थंडी पासून संरक्षण करण्यासाठी नागरिक सकाळी चहावर ताव मारताना दिसताहेत.







