जळगाव जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन; ‘या’ ५ तालुक्यांना अतिमुसळधार इशारा

जुलै 23, 2026 1:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने जिल्ह्यात २० जुलैपासून पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. यामुळे पावसाअभावी सुकत चाललेल्या खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १६ मिमी पावसाची नोंद झाली असून, भडगाव तालुक्यात सर्वाधिक ४० मिमी तर पाचोरा तालुक्यात ३३ मिमी पाऊस झाला आहे.

rain 1 2 jpg webp

गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मात्र मागच्या तीन दिवसात जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केल्याने खरीप पिकांना जीवनदान मिळाले. काल २२ जुलै रोजीदेखील जळगाव शहरासह जिल्ह्याभरात पावसाची रिपरिप सुरूच होती, तर काही भागांत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील पावसाची तूट २५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.

हवामान विभागाने आज २३ जुलै रोजी जळगाव जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. यामध्ये प्रामुख्याने चोपडा, यावल, रावेर, बोदवड आणि मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर अमळनेर, चाळीसगाव, जळगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव आणि भडगाव तालुक्यांना मुसळधार पावसाचा व जामनेर आणि भुसावळ तालुक्यांच्या काही ठरावीक भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सध्या सुरू असलेल्या या पावसाचा जोर जिल्ह्यात २५ ते २६ जुलैपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही दिवस पावसाची उघडीप राहून, पुन्हा ३१ जुलैनंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, पावसाच्या पुनरागमनामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now