जळगाव जिल्ह्यात ‘या’ तारखेपर्यंत पाऊस मुक्काम ठोकणार, शेती पिकांना मोठा दिलासा

जुलै 25, 2026 9:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२६ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मागच्या तीन ते चार दिवसापासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या तीन दिवसांत सुमारे ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पावसाचा मुक्काम ३१ जुलैपर्यंत कायम राहणार आहे.

rain jpg webp

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जळगाव जिल्ह्यात पुढील काही दिवसही पावसाचे अनुकूल वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. ३१ जुलैपर्यंत दररोज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पावसासाठी पोषक वातावरण असेच कायम राहिल्यास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही पाऊस जिल्ह्यात ठाण मांडून बसण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी आठवडाभर जळगावकर आणि शेतकऱ्यांना पावसाची रिपरिप पाहायला मिळणार आहे.

मुसळधार नाही, पण शेतीसाठी लाभदायक

राज्यातील कोकण आणि नाशिक विभागात जोरदार पावसाची नोंद होत असताना जळगाव जिल्ह्यात अद्याप मुसळधार पाऊस झालेला नाही. मात्र, दररोज पडणारा ५ ते १५ मिलिमीटर दरम्यानचा मध्यम स्वरूपाचा पाऊस शेतीसाठी अत्यंत पोषक ठरत आहे. सध्या पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला भिजपाऊस मिळत असल्याने कापूस, सोयाबीन, मका, बाजरी तसेच इतर खरीप पिकांची वाढ वेगाने होत असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा बळावल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या मते, पावसाचा हा नियमित आणि संतुलित पॅटर्न कायम राहिल्यास पिकांच्या उत्पादनात चांगली वाढ होण्याची अपेक्षा असून, यंदाच्या खरीप हंगामाबाबत आशादायी चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात पुढील आठवडाभर पावसाची रिपरिप सुरू राहण्याची शक्यता असल्याने शेतीला आणखी बळ मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now