जळगाव जिल्ह्यातील पावसाबाबत मोठी अपडेट ; आजपासून २३ जूनपर्यंत अशी राहणार स्थिती?

जून 19, 2024 10:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२४ । महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन जवळपास १० ते १२ दिवसांचा कालावधी लोटला. तरी अद्याप अनेक भागात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. जळगाव जिल्ह्यातही जून निम्मा उलटला तरी देखील दमदार पावसाने हजेरी लावली नाहीय. सकाळी उन्हाचा तडका तर सायंकाळी अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, आजपासून बुधवारपासून ते २३ जूनपर्यंत ऊन, ढगाळ वातावरणासह तुरळक व हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

JLRain jpg webp

यंदा वेळेपूर्वी मान्सूनने राज्यात प्रवेश केला आहे. त्यानंतर पावसाचे वातावरण झाले खरे पण, त्याला ताकद लागेना. अजूनही कमी प्रमाणात पाऊस होत आहे. पडेल त्या ठिकाणीच पाऊस असेच चित्र सध्या बघायला मिळत आहे. सोमवारी सायंकाळी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र, मंगळवारी सकाळपासून उन्हाचा तडाका वाढला होता. तापमान ३९ अंशांवर पोहोचले होते.

आठवडाभर तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. उकाड्यानेही जळगावकर हैराण झाले आहेत. २३ जूनपर्यंत शहरासह जिल्ह्यात हलका व तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. २२ जूनला विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. या काळात प्रचंड उकाडा जळगावकरांना सहन करावा लागणार आहे. २४ जूनपासून मान्सून सक्रीय झाला तर १ जुलैपर्यंत पाठस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे

राज्यात काय आहेत स्थिती?
दरम्यान राज्यातील अनेक ठिकाणी काही शेतकऱ्यांनी पहिल्या पावसातच पेरण्या केल्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. अशातच हवामान खात्याने राज्यातील काही भागात पुढील ३-४ दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या ४८ तासांत मान्सून पुन्हा सक्रिय होऊन संपूर्ण महाराष्ट्राला व्यापेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

महाराष्ट्रात कुठे-कुठे कोसळणार पाऊस?
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होईल. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी कृषीविभागाच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now