बळीराजाची चिंता मिटणार! जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

जुलै 19, 2026 11:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी राजा चिंतेत सापडला असून, सर्वांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. अशातच जिल्हावासीयांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे.

rain jpg webp

जळगाव शहर आणि जिल्ह्यात मान्सून पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाला असून, आज म्हणजेच १९ ते २४ जुलै दरम्यान जिल्ह्यात पावसाची सक्रियता कमालीची वाढणार आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे.

असा असेल पुढील काही दिवसांचा अंदाज:

१९ जुलै (आज): जिल्ह्यात आजपासून पावसाला सुरुवात होईल. सुरुवातीला काही भागात हलक्या स्वरूपाच्या सरी बरसतील.

२० आणि २१ जुलै: या दोन दिवसांत पावसाची तीव्रता सर्वाधिक असेल. जिल्ह्यातील अनेक भागांना पाऊस अक्षरशः झोडपून काढेल.

२२ ते २४ जुलै: या काळात मुसळधार पाऊस ओसरला तरी मध्यम स्वरूपाचा पाऊस सातत्याने सुरू राहील.

मान्सून जिल्ह्यात स्थिर; ‘एल निनो’चा प्रभाव ओसरला

हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, मान्सून सध्या जळगाव जिल्ह्यात पूर्णपणे स्थिर झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र मजबूत होत असल्याने पश्चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या उत्तरेकडे वेगाने सरकत आहेत. परिणामी, उत्तर महाराष्ट्रात ढगांची दाटी झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हवामानावर प्रभाव टाकणारा ‘एल निनो’ आता पूर्णपणे ओसरला असून, त्यामुळे मान्सूनची ताकद लक्षणीय वाढली आहे.

२५ ऑगस्टनंतर अनिश्चितता?

सध्या मान्सून सक्रिय होत असला तरी, पुढील महिन्यात म्हणजेच २५ ऑगस्टनंतर पावसाबाबत पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील हा पाऊस शेतीसाठी आणि पाणीसाठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now