दमदार हजेरीनंतर पावसाची उघडीप! बळीराजा चिंतेत, जळगावात ‘या’ तारखेनंतर जोरदार पावसाची शक्यता

जुलै 13, 2026 12:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२६ । जुलैच्या पहिल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात दमदार हजेरी लावल्यानंतर आता पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या आटोपलेला बळीराजा आता पुन्हा एकदा चिंतेत पडला आहे. तर दुसरीकडे, ढगाळ वातावरण नाहीसे होऊन कडक ऊन पडू लागल्याने तापमानात कमालीची वाढ झाली असून, असह्य उकाड्यामुळे जळगावकर घामाघूम झाले आहेत.

rain farmer

१५ जुलैपर्यंत पारा ३८ अंशांवर जाण्याची शक्यता

हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार, जळगाव जिल्ह्यात १५ जुलैपर्यंत कमाल तापमान ३४ ते ३८ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तापमानवाढीसह जळगावकरांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.

दरम्यान, सध्या पावसाचा मुख्य पट्टा उत्तर भारताकडे सरकल्याने उत्तर महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रभाव कमी झाला आहे. समुद्राकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांचे प्रमाण घटल्याने तसेच आकाशात ढगांची संख्या कमी झाल्याने सूर्यकिरणे थेट जमिनीवर पडत आहेत. परिणामी तापमानात वाढ होऊन उकाडा अधिक जाणवत आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामे घाईघाईने उरकून घेतली होती. मात्र, आता कोवळी पिके उगवून वर येत असतानाच पावसाने ओढ दिल्यामुळे पिके कोमेजण्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत आहे.

कधी होणार पाऊस?

हवामान अभ्यासकांच्या मते, १५ जुलैनंतर वातावरणात हळूहळू बदल होईल. जळगाव जिल्ह्यात १७ जुलैनंतर हलका व तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर २० जुलैनंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस सक्रिय होऊ शकतो. त्यामुळे पुढील काही दिवस जळगावकरांना उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now