जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२६ । जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत तब्बल ७५ कोटी ३९ लाख रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. प्रत्यक्षात शेतात केळीची लागवड नसतानाही कागदोपत्री बागा दाखवून शासन आणि विमा कंपनीची फसवणूक करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी प्रशासनाने कडक कारवाई करत जिल्ह्यातील ६ तालुक्यांमधील ४२ CSC केंद्र चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

खरंतर जळगाव जिल्हा हा केळीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र सध्या जिल्ह्यात केळी पीकविमा घोटाळा आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या विशेष चौकशीत ही धक्कादायक बाबी समोर आल्या. सुमारे ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड नसतानाही २९ हजार शेतकऱ्यांच्या नावावर विमा उतरवण्यात आला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात बोगस नोंदी करून विमा हप्ता आणि संभाव्य नुकसानभरपाई हडपण्याचा कट रचल्याचे उघड झाले.

या घोटाळ्यात CSC केंद्र चालकांनी संगनमताने ऑनलाइन पोर्टलवर खोट्या नोंदी केल्याचे आढळले. पडीक जमीन किंवा इतर पिकांवरही केळी दाखवून कोट्यवधींचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर कृषी आयुक्तालयाने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, ६ तालुक्यांमधील ४८ सीएससी चालकांची नावे समोर आली असून, प्राथमिक टप्प्यात ४२ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
पोलीस आणि कृषी विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या कटात इतर कोणाचे संगनमत आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. या घोटाळ्यामुळे पीकविमा योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, खऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.







