जळगाव जिल्हा बँकेनं नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी घेतला महत्वाचा निर्णय

मार्च 10, 2026 10:24 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२६ । राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असून सोबतच कर्जाचे हप्ते नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५०,००० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. यानंतर आता नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जळगाव जिल्हा बँकेने घेतला आहे.

jdcc bank farmer

जिल्हा बँकेकडून १ लाख ६४ हजार ८६५ शेतकऱ्यांकडून सुमारे ६२ कोटी ३२ लाख रुपयांचे व्याज न घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

याशिवाय ३१ मार्चपर्यंत कर्जाची पूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदानही दिले जाणार आहे. दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

एप्रिल २०२५ मध्ये १ लाख ६४ हजार ८६५ शेतकऱ्यांनी एकूण १०७२.१५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. शासनाने दोन लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. दोन लाखांच्या आतील थकबाकीदार ८१,३९४ शेतकऱ्यांनी २७३.२७ लाख रुपयांचे कर्ज घेतले असून त्यावर १३७.०१ लाख रुपये व्याज थकले आहे. तर दोन लाखांवरील थकबाकीदार १०,८६१ शेतकऱ्यांकडे २२६.५८ लाख रुपयांचे मुद्दल आणि ३२८.१० लाख रुपये व्याज थकले आहे.

चार वर्षांपासून रखडलेला गटसचिवांच्या पगाराचा प्रश्न सुटला

दरम्यान, गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या २४५ गटसचिवांच्या थकीत पगाराचा प्रश्नही अखेर निकाली निघाला आहे. थकबाकीदारांकडून कर्ज वसुली न झाल्यामुळे सुमारे ७ कोटी ६७ लाख ७७ हजार रुपयांचे पगार थकले होते. आता जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून विकास सोसायट्यांना फिक्स लोन देऊन त्यातून हा पगार दिला जाणार आहे.तसेच यापुढे विकास सोसायट्यांना थेट वित्तपुरवठा न करता सोसायटीमार्फतच कर्ज देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. यासंदर्भात जिल्हा बँकेत गटसचिवांची बैठक घेण्यात आली होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now