⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

Jalgaon Crime : हमाली करताना पाहिला युट्युबचा व्हिडिओ, घरीच उघडला नकली नोटांचा छापखाना

जळगाव लाईव्ह न्यूज | चेतन वाणी | युट्यूब पाहून कुणी चांगली गुण घेतात तर कुणी अवगुण आत्मसात करतात. जळगावात हमाली काम करता करता युट्यूबला एकाने बनावट नोटा बनविण्याचा व्हिडिओ पाहिला आणि घरीच २० हजारात नकली नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला. ५० हजारात दीड लाखाच्या नोटा देणाऱ्या महाठगला उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली. पथकाने त्याच्याकडून १ लाख ६८ हजार ९०० रुपयांच्या १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात नकली नोटा चलनात आल्या असून पोलिसांकडून काही दिवसापूर्वी देखील बनावट नोटा पोलिसांनी पकडल्या होत्या. बुधवारी चोपडा उपविभागीय कार्यालयातील पोलीस नाईक राहुल बैसाने यांना एक व्यक्ती बनावट नोटा छपाई करून विक्री करीत असल्याबाबत माहिती मिळाली होती. बैसाने यांनी याबाबत लागलीच जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांना कळविले. गावीत यांनी लागलीच आपले विशेष पथक बोलाविले आणि रवाना केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख, पोलीस कर्मचारी महेश महाले, रविंद्र मोतीराया, निलेश पाटील, सचिन साळुंखे, सुहास पाटील, राहुल बैसाने, रेवानंद साळुंखे, चंद्रकांत पाटील, विजय पाटील यांनी सापळा रचून नोटा छपाई करणाऱ्या देविदास पुंडलिक आढाव वय-३१ रा.कुसुंबा याला बोलाविले. पथक अगोदरच कुसुंबा परिसरात सापळा लावून बसलेले होते.

पथकातील एका कर्मचाऱ्याने संपर्क केल्यावर देविदास आढाव याने एका जागेवर नोटा खरेदीसाठी बोलाविले. ५० हजारात दीड लाखांच्या बनावट नोटा देण्याचा हिशोब ठरला होता. पोलिसांनी त्याला तीन लाखांच्या नोटांची मागणी केली होती. आढाव याला संशय आल्याने अगोदर त्याने पोलिसांना चकवा दिला. सुमारे तीन तास पोलिसांना चकवा दिल्यावर त्याने गावाबाहेर एका टेकडीवर बोलाविले. आढाव दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीयू.१२०३ घेऊन त्याठिकाणी उभा होता.

पथकातील दोन कर्मचारी अगोदर पुढे गेले आणि त्यांनी त्याच्याकडून नोटा पाहून त्याला ताब्यात घेताच लपलेले इतर कर्मचारी देखील तिथे पोहचले. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या पथकाने देविदास आढाव यांच्याकडून १००, २०० आणि ५०० च्या १ लाख ६८ हजार ९०० रुपयांच्या नकली नोटा हस्तगत केल्या. पथकाने त्याच्या घरून प्रिंटर, रंग आणि नोटा छपाईचे कागद हस्तगत केले आहेत. आढाव याच्याकडून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.