जळगाव काँग्रेसमध्ये ‘भाकरी फिरली’! तीन नवीन जिल्हाध्यक्षांची घोषणा

मे 21, 2026 12:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसच्या तीन नवीन जिल्हाध्यक्षांची निवड अखेर जाहीर करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने रात्री उशिरा या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.या नव्या निवडींमध्ये काँग्रेसने पक्ष संघटनेत ‘भाकरी फिरवत’ तरुण आणि निष्ठावंत चेहऱ्यांना संधी दिली आहे.

congress jpg webp

या तीन जणांना संधी
यामध्ये जळगाव पूर्व म्हणजेच रावेर लोकसभा क्षेत्राच्या जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी युवा नेते धनंजय शिरीष चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर जळगाव लोकसभा क्षेत्राच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड. अविनाश भालेराव व जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी जमील शेख यांची निवड करण्यात आलीय.

जिल्हाध्यक्षपदाची धुरा मिळालेले धनंजय चौधरी हे जळगाव काँग्रेसच्या इतिहासातील आजवरचे सर्वात तरुण जिल्हाध्यक्ष ठरणार आहेत. त्यांनी रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांना यश आले नसले, तरी त्यांनी मतदारसंघात सातत्याने जनसंपर्क ठेवला आणि पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवण्याचे काम केले; याच कामाची पावती म्हणून त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

धनंजय चौधरी यांना मोठा राजकीय आणि सामाजिक वारसा लाभला आहे. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी धनाजी नाना चौधरी, माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी आणि त्यांचे वडील माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्यानंतर आता चौधरी कुटुंबातील चौथ्या पिढीला काँग्रेसमध्ये मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.

जिल्ह्यात आता एक ऐवजी तीन जिल्हाध्यक्ष
मावळते जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी आधीच स्पष्ट केले होते की, पक्षाची ताकद आणि भौगोलिक रचना लक्षात घेता यावेळी जिल्ह्यात एक ऐवजी तीन जिल्हाध्यक्ष दिले जातील. त्यानुसार हायकामांडने जळगाव पूर्व, जळगाव पश्चिम आणि महानगर अशी तीन भागात विभागाणी करून नवीन नियुक्त्या केल्या आहेत

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories