जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२५ । जळगाव शहरातून अपघाताची एक मोठी घटना समोर आलीय. ज्यात टाइल्स घेऊन जाणाऱ्या भरधाव मालवाहू वाहनाने काही वाहनांना धडक देत थेट एका दुकानात प्रवेश केला. या अपघातात स्वप्निल अशोक कापुरे (४०, रा. नवजीवन कॉलनी, वाघनगर) यांचा मृत्यू झाला. अन्य तिघेजण जखमी झाले असून, त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आलीय.

नवजीवन कॉलनीतील स्वप्निल कापुरे हे एका कंपनीत नोकरीला होते. त्यांची पत्नी एरंडोल येथे भूमिअभिलेख कार्यालयात नोकरीस आहे. कापूरे हे कंपनीतून दुचाकीने (एमएच १९, ईक्यू ४२१३) घरी जात असताना टाइल्स घेऊन जाणाऱ्या विनाक्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर मालवाहू वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने समोरून येणाऱ्या इतर दुचाकीस्वारांना धडक देत त्यानंतर हे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात शिरले.

स्वप्निल कापुरे यांना धडक दिल्यानंतर ४० ते ५० फुटांपर्यंत फरफटत नेले. दुचाकी वाहनाच्या खाली अडकल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच इतर दुचाकीवरील तिघाजणांना दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना कापुरे यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करताच त्यांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला. मृताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान या अपघातात जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, या अपघाताला नेमका चालकाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला की तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.












