जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२६ । आखातातील युद्धाचे ढग आता जळगावकरांच्या स्वयंपाकघरापर्यंत पुरवठा विस्कळीत झाल्यानं गेल्या काही दिवसांपासून शहर व जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांची प्रचंड फरपट होत आहे. एकीकडे पुरवठा विभाग परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे गॅस वितरकांकडे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

यातच जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. संभाव्य गॅस टंचाई टाळण्यासाठी जिल्ह्यात विशेष भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या आदेशानुसार या पथकात तहसीलदार, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) यांच्या विक्री अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकारी आणि पुरवठा निरीक्षकही या पथकात सहभागी आहेत.
सध्या पश्चिम आशिया प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर घरगुती गॅस सिलेंडरची संभाव्य टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे.
येथे करा तक्रार?
दरम्यान, नागरिकांना घरगुती गॅस पुरवठ्याबाबत काही तक्रारी असल्यास ०२५७-२२२३१८० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा [email protected] या ई-मेलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.









