जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरांमध्ये होणाऱ्या अपघाताच्या घटना काही थांबताना दिसत नसून शनिवारी भरधाव डंपरने विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेला काही तास उलटत नाही तोच पुन्हा एकदा भरधाव जाणाऱ्या व बेफाम बुलेट चालकाने शतपावलीसाठी बाहेर पडलेल्या इसमाला जबर धडक दिली. त्यात डोक्याला मार लागल्याने इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. सिकंदर दिलावर पठाण (वय ५६, रा. शिवाजी नगर, जळगाव) असे मयत इसमाचे नाव असून याबाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सिकंदर दिलावर पठाण हे जळगाव शहरातील शिवाजी नगरमध्ये परिवारासह वास्तव्यास असून ते सेंट्रींग तसेच ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत उदरनिर्वाह करीत होते. शनिवारी दि. २५ जानेवारी रोजी संध्याकाळी जेवण करून शतपावली करण्यासाठी ते बाहेर पडले असता काही अंतरावर भरधाव आलेल्या बुलेटस्वारकाने त्यांना मागून जबर धडक दिली. या धडकेत सिकंदर पठाण यांच्या डोक्याला जबर मार लागून ते जागीच गतप्राण झाले.
भरधाव बुलेट पुढे एका रिक्षाला धडकली. बुलेट (एम एच १९ ई एन ६७८०) वरील चालक तरुणाला रिक्षातील नागरिकांनी पकडुन पोलिसांना बोलाविले. सिकंदर पठाण यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. कुटुंबियांना समजताच त्यांनी रुग्णालयात येऊन एकच आक्रोश केला. घटनेबद्दल रात्री उशिरापर्यंत जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.