जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२५ । जळगाव जिल्ह्यात जवळपास तीन आठवड्याच्या ब्रेकनंतर पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे खरिपाच्या पिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी जळगावकरांची चिंता वाढली आहे. कारण आगामी काही दिवस जिल्ह्यात पावसाला पुन्हा ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. दरम्यान काल पावसाने विश्रांती घेतल्याने एकाच दिवसात तापमानात ३ अंशापर्यंतची वाढ झाली.

जळगाव जिल्ह्यात यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला दोन-चार दिवस चांगला पाऊस झाला. मात्र यानंतर पावसाने मोठा ब्रेक घेतल्याने खरेदीप पिके धोक्यात आली होती. मात्र गेल्या आठवड्यात पावसाने पुनरागमन करत हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांना जीवनदान मिळाले. पण गेल्यावर्षीपेक्षा यंदा पावसाची आकडेवारी कमीच आहे. बुधवारपर्यंतच्या (दि. ३०) आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी याच तारखेला ३८५ मिमी पावसाची नोंद झाली होती, तर यंदा केवळ २४४ मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १४१ मिमी पाऊस कमी झाला आहे.तर जुलै महिन्यात सरासरी १८३ मिमी पाऊस अपेक्षित असतो; पण यंदा तो १२७ मिमीवरच थांबला आहे.

आता हवामान खात्याचा अंदाज काय ?
दरम्यान राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस ओसरला आहे. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी काही दिवस जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम राहील आणि तुरळक पावसाची हजेरी लागेल. मात्र, पुढील ५ ते ६ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात दमदार पावसाची शक्यता कमी आहे. दरम्यान दुसरीकडे मागच्या काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे जळगावचे तापमान ३० अंशाखाली होते. मात्र काल बुधवारी पावसाने विश्रांती घेतल्याने एकाच दिवसात तापमानाचा पारा ३ अंशानी वाढला. मंगळवारी २७.७ वर असलेलं तापमान बुधवारी वाढून ३१ अंशावर पोहोचले.
पिकांना तात्पुरता दिलासा;
दरम्यान जिल्ह्यात गेल्या चार पाच दिवसापासून सुरु असलेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र, अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत, उगवलेल्या पिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.








