जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । भुसावळ शहरात सोमवारी जागतिक हिवताप दिनानिमित्त प्रमुख शाळा, महाविद्यालय व गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना माहितीपत्रकाचे वितरण करण्यात आले. सोबतच मलेरिया वाढीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या एडीस इजिप्ती डासांच्या अळ्या, या अळ्या नष्ट करणारे गप्पी मासे दाखवून जनजागृती केली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संगीता दवंगे-पांढरे, पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती फलटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने सोमवारी जागतिक हिवताप दिवस साजरा केला. यानिमित्ताने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी माहिती पत्रकांचे वितरण केले. तर शहरातील प्रमुख गर्दीचे ठिकाणी, बसस्थानक, शाळा महाविद्यालयांमध्ये जावून एडिस इजिप्ती डासांच्या अळ्या व गप्पी मासे दाखवण्यात आले. कोणताही ताप हिवताप असू शकतो. म्हणून ताप येणे, तापात चढ-उतार होणे, मळमळ, डोकेदुखी, घाम येणे आदी लक्षणे असल्यास त्वरित रक्ताची तपासणी करुन घ्यावी. हिवतापाचे रोगनिदान व औषधोपचार मोफत केला जातो, अशी माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली. या उपक्रमात आरोग्य सहाय्यक सुनील महाजन, ज्ञानदेव चोपडे, प्रशांत चौधरी, भानुदास चौधरी, मुश्तकीन काझी आदींनी सहकार्य केले.
हिवताप रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. घराचा भाग, परिसर व आपले शहर स्वच्छ ठेवावे. पाण्याची डबकी वाहती करावी अथवा मातीने बुजावावी. दारे खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळी बसवून घ्यावी. डबके व गटारींमध्ये गप्पी मासे सोडावेत, कोरडा दिवस पाळावा, असा सल्ला आरोग्य सहाय्यक सुनील महाजन यांनी दिला.