माजी खा.ईश्वरलाल जैन यांची अशोका बिल्डर्सच्या मालकाकडून २४ कोटीत फसवणूक
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । उत्तर महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी असलेल्या अशोका बिल्डर्सच्या मालकांनी २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ रुपयात फसवणूक केल्याची तक्रार माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी दिली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यात अशोका बिल्डर्सचे मालक अशोक मोतीलाल कटारिया, स्नेहल सतीश पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री, सतीश धोंडूलाल पारख, आशिष अशोक कटारिया व राजेंद्र चिंधूलाल बुरड (सर्व रा.नाशिक) यांच्याविरुध्द फिर्याद देण्यात आली आहे.
माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नाशिक येथील अशोका बिल्डर्सचे मालक अशोक कटारिया यांच्यासह पाच जणांनी ईश्वरलाल जैन यांच्याकडून २०१०-११ ते २०१४-१५ या काळात ११ कोटी रुपये व १९ कोटी २४ लाख ६० हजार १२५ रुपये हातउसनवारीने घेतले. त्यातील काही रक्कम या लोकांनी जैन यांना परत केली. उर्वरित ६ कोटी ९९ लाख ३६ हजार ७४१ व १७ कोटी ६३ लाख ८० हजार २१० अशी एकूण २४ कोटी ६३ लाख १६ हजार ९५१ परत मागण्यासाठी तगादा लावला असता त्यांनी मुदतीची मागणी करुन रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर राजेंद्र बुरड व स्नेहल पारख यांनी ६ कोटी ९९ लाख ७४१ रुपये देण्यास मुदत मागून जॉईंट व्हेंचर अग्रीमेंट तयार करु असे सांगून काही दस्ताऐवज आणले. हे दस्ताऐवज रक्कम परत करण्यास मुदतवाढीचे होते. त्यानंतर १७ कोटी ६३ लाख ८० हजार २१० च्या थकबाकीपोटी देखील संयुक्त करारनामा तयार करुन आणला. या सर्व लोकांवर विश्वास ठेऊन या करारावर आपण सह्या केल्या, असे ईश्वरलाल जैन यांनी म्हटले आहे.
या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, याच काळात मानराज मोटर्स कंपनीला २५ कोटी रुपये तात्काळ देणे असल्याने जैन यांनी रक्कम परत करण्याबाबत पुन्हा या लोकांकडे तगादा लावला. ही संधी साधून दोन्ही जॉईंट व्हेंचर अग्रीमेंटच्या बदल्यात तिसरा पक्ष म्हणून मानराज मोटर्सचे संचालक अशोक बेदमुथा यांना व्यवहारात आणून ३ मार्च २०१७ रोजी डीड ऑफ असाईनमेंट दस्ताऐवज या पाच जणांनी बनवून आणले. आपल्या व्यवहारापोटी कटारिया हे परस्पर मानराज मोटर्सला देण्यास तयार असल्याने या करारावर जैन यांनी सही केली. त्यानंतर देखील सहा महिन्याच्या तोंडी मुदतीत रक्कम परत केली नाही. आडगाव, ता.नाशिक, विहिगाव, ता.शरणपूर, जि.ठाणे, सिन्नर व सातपूर येथील जमिनीच्याबाबत करार झालेला होता. यातील काही वाद न्यायालयात आहेत. सिन्नरची जमीन केंद्र सरकारने संपादित केलेली आहे, ही बाब देखील कराराच्यावेळी लपवून ठेवल्याचे जैन यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.
या फिर्यादीवरुन अशोका बिल्डर्सचे मालक अशोक मोतीलाल कटारिया, स्नेहल सतीश पारख उर्फ स्नेहल मंजीत खत्री, सतीश धोंडूलाल पारख, आशिष अशोक कटारिया व राजेंद्र चिंधूलाल बुरड (सर्व रा.नाशिक) यांच्याविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक बळीराम हिरे तपास करीत आहेत.
अशोका ग्रुपच्या अधिकृत वकिलांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, अशोका ग्रुप हा कायदेशिर व स्वच्छ व्यवहारांवर भरवसा ठेवतो. ही केस अगोदरच न्यायालयातून रद्दबातल झालेली होती. उलटपक्षी या केसमध्ये आमचीच फसवणूक झालेली आहे. प्रत्यक्षात सर्वांनाच माहीत आहे की, यापूर्वी प्रसार माध्यमातून आलेल्या बातम्यानूसार माजी खा.ईश्वरलाल जैन हे आर्थीक अडचणीत असल्याचे दिसून येत होतेे. अनेक बँकांनी त्याच्याकडे शेकडो कोटी रुपयांच्या वसूलीसाठी तगादा लावल्याचे वृत्त आपणास ज्ञातच आहे. ते आपल्या संपर्काचा वापर करुन आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमचा न्यायव्यवस्थेवर भरवसा आहे. त्यामूळे आम्हाला न्याय मिळेल हा पूर्ण विश्वास आहे. आमच्या चारीत्र हननाच्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.