⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

चाळीसगावच्या सोलर कंपनीवर आंदोलन, प्रकल्पग्रस्तांचा हल्ला, ४५ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा, चोरीसह १ कोटींचे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील बोढरे शिवारात असलेल्या जेबीएम सोलर कंपनी आणि आवादा ग्रुप फर्मी सोलर कंपनी पहिल्यापासूनच चर्चेत आहे. दि.११ ऑक्टोबर रोजी काही नागरिकांनी कंपनीबाहेर आंदोलन केले होते. आंदोलकांमधील काहींनी चिथावणी दिल्याने आंदोलन चिघळले आणि आंदोलकांनी कंपनीवर हल्ला केला. कंपनीतील सोलर पॅनल चोरून नेणे, घातक हत्यारांचा उपयोग करणे, कंपनीतील सोलर पॅनलची तोडफोड करणे अशी कृत्ये केल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलिसात तब्बल ४५ आंदोलकांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगावच्या या गुन्ह्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील बोढरे, शिवापूर शिवारात जेबीएम सोलर कंपनी आणि आवादा ग्रुप फर्मी सोलर कंपनी आहे. कंपनीच्या सुरुवातीपासूनच प्रकल्पग्रस्त स्थानिक नागरिक, शेतकरी आणि काही सामाजिक संघटना त्याठिकाणी आंदोलन करीत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी अवाजवी दराने खरेदी करून सोलार कंपनीने शेतकऱ्यांवर अन्याय केल्याच्या आरोप करत व जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी गेल्या चार वर्षांपासून पिडीत शेतकऱ्यांसह शेतकरी बचाव कृती समितीकडून लढा सुरू आहेत. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांसह शेतकरी बचाव कृती समितीने अनेक वेळा मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन केली.

आपल्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने समितीने २१ सप्टेंबर २०२१ रोजी बेमुदत धरणे आंदोलन पुकारले होते. तब्बल अठरा दिवस भरपावसात आंदोलन सुरु असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष हे पीडित शेतकऱ्यांकडे लागले होते. त्यात चौकशीचे लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. आंदोलनाला एक वर्षे पूर्ण होत आले तरीही शेतकरी अद्याप न्यायापासून वंचित आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यात तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन दिले होते.

निवेदनात म्हटले होते कि, शासनाला जे काही चौकशी अहवाल सादर करण्यात आले आहे. त्यावर तात्काळ सुनावणी घेऊन सोलर प्रकल्पावर कारवाई न झाल्यास येत्या ७ आक्टोंबर २०२२ पासून प्रकल्पासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मात्र दिलेल्या अहवानानुसार कुठलीही कारवाई झाली नाही. म्हणून संतप्त शेतकऱ्यांनी सोलर प्रकल्प गाठून शुक्रवार दि.७ पासून बेमुदत आंदोनला सुरुवात केली. मात्र चार दिवस उलटले तरीही कुणी दखल न घेतल्याने आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत सोलर प्रकल्पावर दि.११ रोजी हल्ला चढवला.

आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यात जेबीएम सोलर कंपनीच्या ५६ लाख ४० हजारांच्या सोलर प्लेट, आवादा ग्रुप फर्मी सोलर कंपनीच्या ३८ लाखांच्या सोलर प्लेट तुटून नुकसान झाले आहे. तसेच जेबीएमच्या ९६ हजारांच्या तर आवादाच्या ६६ हजार ५०० रुपयांच्या सोलर प्लेट चोरून नेण्यात आल्या आहेत. कंपनीचे एकूण ९६ लाख २ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीचे व्यवस्थापक कैलास विठ्ठलराव घुगे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलीस ठाण्यात भीमराव बुधा जाधव व भरत पांडुरंग चव्हाण यांच्यासह ४५ आंदोलकांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ढेंगे करीत आहेत.