गुलाबराव देवकरांच्या शैक्षणिक संस्थेच्या चौकशीसाठी सहकार विभागाचे पथक जिल्हा बँकेत दाखल

मे 5, 2025 6:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । शनिवार ३ मे रोजी मुंबई येथे जळगाव जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह माजी अनेक मोठ्या नेत्यांनी अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. या प्रवेश केल्याच्या घटनेनंतर अवघ्या चोवीस तासांतच गुलाबराव देवकर यांच्या
संस्थेने घेतलेल्या कर्ज प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

GD

श्रीकृष्ण शिक्षण संस्थेच्या वतीने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेण्यात आलेल्या तब्बल १० कोटी रुपयांच्या कर्जाबाबत ही चौकशी आहे. या संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर आहेत. हे कर्ज बेकायदेशीररीत्या घेतले गेले असल्याचा आरोप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला होता. त्यांनी देवकर यांच्यावर अनेक आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत, “घोटाळ्यांना झाकण्यासाठीच त्यांनी गटबदल केला,” असा आरोप केला होते.या पार्श्वभूमीवर आज सकाळी सहकार विभागाचे पथक जळगाव जिल्हा बँकेवर दाखल झाले. शिरपूर येथील सहायक निबंधक राजेंद्र वीरकर यांच्या नेतृत्वाखाली हे पथक चौकशीसाठी आले असून, धुळे जिल्हा उपनिबंधकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे.

दरम्यान, बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी चौकशी पथकास संपूर्ण सहकार्य केले जात असून, मागितलेली सर्व कागदपत्रे प्रदान केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. राजकीय गोटात या घडामोडींची जोरदार चर्चा असून, गुलाबराव देवकर यांच्यावर दबाव वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment