जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । जळगाव तालुक्यात सीएमव्हीमुळे चिनावल, कुंभारखेडा, गौरखेडा शिवारातील केळी बागा बाधित झाल्या आहेत. जुलै व ऑगस्टमध्ये लागवड झालेल्या केळीवर हा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे कुंभारखेडा व गौरखेडा शिवारातील शेतकरी राजेश महाजन यांनी ५ हजार, सोपान महाजन यांनी ४ हजार, गोपाळ पाटील, चंद्रकांत पाटील यांचे प्रत्येकी ६ हजार, विजय राणे यांनी ४ हजार रोपे उपटून फेकली आहेत.
जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल तालुक्यातील केळीवरील संकटे कमी होण्यास तयार नाही. करणं आठवडाभरापासून केळी पट्ट्यात नवीन बागांमध्ये कुकुंबर मोझाक व्हायरसने शिरकाव केला आहे. जिल्ह्यातील केळीवरील संकटांची मालिका कायम आहे. कधी वादळ, गारपीटीने होणारे नुकसान, तर कधी अती तापमान व कडाक्याच्या थंडीने बसणारा फटका शेतकऱ्यांना नवीन नाही.
त्यात पडणारे बाजारभाव, होणाऱ्या लुटीमुळे केळीचे अर्थकारण गडगडते. दरम्यान, मागील हंगामात २ हजारापर्यंत विक्रमी भाव मिळाल्याने शेतकरी यंदा नव्या जोमाने कामाला लागले आहेत. मात्र, कपाशी पिकावर पांढरी माशी आल्यानंतर येणाऱ्या सीएमव्हीमुळे केळीचा प्लॉट वाया जाण्याचा धोका वाढला आहे. रावेर, यावल तालुक्यात काही ठिकाणी सीएमव्हीचा प्रादुर्भाव जाणवण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी केळी बागेवर फवारणी करत आहे.