शाळेत इंटरॅक्ट क्लब विद्यार्थ्यांच्यासर्वांगीण विकासाला चालना देणार – रमेश मेहेर
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकसित करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. यामध्ये शासन स्तरावरील उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय रोटरीच्या माध्यमातून उद्याचे सुजाण नागरिक घडवण्यासाठी इंटरॅक्ट क्लबची स्थापना करावी. या योजनेचा लाभ मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना करून द्यावा. त्यांच्यामधील सर्वांगीण विकासाला चालना द्यावी, असे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल रमेश मेहेर यांनी केले.
वरणगाव शहरातील रोटरीच्या चार क्लबचे निरीक्षण व परीक्षणासाठी प्रांतपाल रमेश मेहेर हे शहरात दाखल झाले आहेत. त्यानिमित्त ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रथमोपचार मिळावे, यासाठी रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅलीतर्फे, प्रथमोपचार पेटी वाटपाचा कार्यक्रम दीपनगर येथील श्री शारदा माध्यमिक विद्यालयात झाला. या प्रथमोपचार पेटीत प्रथमोपचारासाठी लागणारे साहित्य, सोबतच मुलींसाठी सॅनिटरी पॅडचा समावेश करण्यात आला आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये परिसरातील १५ शाळांना पेटीचे वाटप करण्यात आले. लवकरच इतर शाळांनाही ही पेटी देण्यात येणार आहे. तसेच कापडी पिशव्या यावेळी वाटप करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅली चे अध्यक्ष डॉ.संजू भटकर हे होते. यावेळी क्लबचे सेक्रेटरी जीवन महाजन, ट्रेझरर सुनील वानखेडे, विद्यालयाचे प्राचार्य जी.डी.चौधरी, रोटरी क्लब भुसावळ ताप्ती व्हॅलीच्या नूतन अध्यक्षा नूतन फालक, सेक्रेटरी मनीषा पाटील, प्रोजेक्ट चेअरमन मीना नेरकर, को-चेअरमन राहुल सोनार, पर्यवेक्षक जे.बी.पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुकेश अग्रवाल यांनी केले. तर आभार धर्मेंद्र मेंडकी यांनी मानले.