⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

पंढरपूरला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भुसावळच्या भाविकांच्या मिनी बसला भीषण अपघात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२३ । पंढरपूरला देवदर्शनासाठी जाणाऱ्या भुसावळ येथील भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला भीषण अपघात झाला असून यात चार जण गंभीर, तर चार किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना बीड तालुक्यातील रौळसगावजवळ घडली असून जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

भुसावळ येथील कोळी कुटुंब व त्यांचे नातेवाईक (एमएच १९ वाय ६१०२) या क्रमांकाच्या खाजगी मिनी बसने पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते. यात जवळपास १७ प्रवासी होते. सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील रौळसगावजवळ जात असताना याच भाविकांच्या मिनी बसवरील चालकाचे ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मिनी बसला मागून राज्य परिवहन महामंडळाच्या बसने (एमएच १४ डीटी १९२९) धडक दिली. पाठीमागून धडक दिल्याने मिनी बस रस्त्याच्या खाली गेली. तसेच समोरील भागही चक्काचूर झाला. यात मिनी बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले.

जखमींमध्ये चौघांची प्रकृती चिंताजनक असून, चौघांची स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या बीड व परिसरातील नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे.

जखमींचे नाव :
जखमींमध्ये नर्मदा एकनाथ कोळी (वय ६०), कैलास बोदडे (चालक), अश्विनी सपकाळे (वय २५), राजर्षी कोळी (१६) हे गंभीर जखमी आहेत. आशा कोळी (५०), सुरेखा कोळी (४०), मनीषा कोळी (४०), राहुल कोळी (३२) हे किरकोळ जखमी आहेत. हे सर्व जखमी भाविक भुसावळ येथील रहिवासी आहेत.