जळगाव लाईव्ह न्यूज| २० ऑगस्ट २०२३। भारतीय लष्कराचे वाहन रस्त्यावर आदळून 9 जवान शहीद झाल्याची घटना लडाखमधील क्यारी शहरापासून 7 किमी अंतरावर घडली. या जवानांमध्ये एक ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरचाही समावेश आहे.
माहितीनुसार, भारतीय जवान कारू गॅरीसनपासून लेहजवळील क्यारी शहराकडे जात होते. मात्र सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास क्यारी शहराजवळ असतांना जवानांचे वाहन दरीत कोसळले. या वाहनातून 10 पेक्षा जास्त जवान प्रवास करीत होते. खोल दरीत वाहन कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या 9 जवानांना आपला जीव गमवावा लागला, तर इतर काही जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्करी जवानांच्या अपघातानंतर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. सिंह यांनी ट्विट केले की, ‘लडाखमधील लेहजवळ झालेल्या भारतीय जवानांच्या मृत्यूने मी दु:खी झालो आहे. देशाप्रती त्यांनी दिलेले योगदान कोणीही विसरणार नाही. शहीद जवानांच्या कुटुंबाप्रती माझ्या सहवेदना आहेत. जखमी जवानांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना करतो,’ अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला.