जळगाव लाईव्ह न्यूज । मध्यपूर्व देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून त्याचा परिणाम भारतातील इंधन दरांवर दिसून येत आहे. विशेषतः उद्योग आणि व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या प्रीमियम इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

प्रीमियम किंवा उच्च दर्जाच्या पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर २ रुपये तर औद्योगिक वापरासाठीच्या बल्क डिझेलच्या दरात सुमारे २२ रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांसाठी विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.

या दरवाढीनंतर जळगावात प्रीमियम पेट्रोलचे प्रतिलिटरचे दर ११२ रुपये ४५ पैशांवरून ११४ रुपये ५४ पैशांवर गेले आहेत. नवीन दर २० मार्चपासून लागू झाले आहेत. त्यामुळे जळगावच्या ग्राहकांना आता प्रतिलिटरमागे दोन रुपये जादा मोजावे लागणार आहेत.
हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या प्रीमियम इंधनांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामध्ये एचपीसीएलचे पॉवर पेट्रोल आणि आयओसीएलचे एक्सपी ९५ यासारख्या बँडेड पेट्रोलचा समावेश आहे. हे पेट्रोल प्रामुख्याने चांगल्या इंजिन कार्यक्षमतेसाठी व अधिक मायलेजसाठी वापरले जाते.







