जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२५ । केळी (Banana) उत्पादक शेतकऱ्यांसाठी समाधानकारक एक बातमी आहे. आगामी महाशिवरात्री (Mahashivratri) व रमजान ईदकरिता (Eid)केळी मालाची मागणी वाढली असून यामुळे खान्देशी (Khandesh) केळीचा भाव खात आहे. किमान भावात ४०० ते ५०० रुपयांनी झालेली वाढ आता १,८०० रुपयांवर स्थिरावली असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
वाढती

संक्रांतीनंतर ऊनाचे चटके बसू लागल्याने थंडीमुळे बागेत परिपक्वतेसाठी खोळंबलेला केळीमाल तयार होऊन आवक बऱ्यापैकी सुरू झाली होती. तथापि, मुंजोबाच्या यात्रांपासून थंडीचा जोर पुन्हा फिरून वाढल्याने केळीमालाची आवक काही अंशी खोळंबली आहे.
इतर ठिकाणांहूनही आवक सुरु होणार
थंडीचा प्रकोप नसलेल्या आंध्र प्रदेशातील केळीमालाचा गुणात्मक दर्जा चांगला आहे. या शिवाय त्याची आवकही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु असे असताना येत्या महाशिवरात्रीचा व रमजान ईदचा सण उत्सव पाहता खान्देशी केळीमालाची बाजारात मोठी मागणी वाढली आहे. परिणामतः केळीमालाचे कमाल भाव २,२०० ते २,५०० रुपये प्रतिक्विंटल वर स्थिर असताना किमान भाव मात्र १,३०० ते १,४०० रुपये प्रतिक्विंटलवरून ५०० रुपयांनी वाढून सद्यस्थितीत १,८०० रुपये किमान भावावर स्थिरावले आहेत.
दरम्यान, आंध्र प्रदेशातील केळीमाल आता काही दिवसांनी संपुष्टात आल्यानंतर जळगावसह शहादा, शिरपूर तथा गुजरातमधील केळीमालाची आवक सुरू होणार असली तरी हळूहळू वाढ होत असलेल्या उष्णतेमुळे केळीमालाचीही मागणी वाढणारी असल्याने केळीभावात वाढ अपेक्षित ठरली आहे.
केळीची पुढील २५ दिवसांनंतर परदेशात निर्यातही सुरू होणार आहे.गेल्या पंधरवड्यात खान्देशात केळीची प्रतिदिन २४ ट्रक केळीची आवक झाली होती. त्यात पाच ते सहा ट्रकने मागील काही दिवसांत वाढ झाली आहे.