जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जानेवारी २०२५ । मराठी पत्रकारितेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (Artificial Intelligence) आधारित माय एआय रिपोर्टर स्टार्टअपचे उद्घाटन आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या हस्ते आज करण्यात आले. माय एआय रिपोर्टर मध्ये स्थानिक, जिल्हा पातळीवरील, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीपासून विविध प्रकारच्या बातम्यांचे लेखन व पुर्नलेखन करणे सहज शक्य होणार आहे. यात ट्विटरवरील ट्रेंडीग विषयांवरुन बातम्या, एफआयआरमधून बातमी किंवा एखाद्या निवेदनवरुन देखील बातमी तयार करता येणार आहे. मराठी भाषेत हा देशातील पहिलाच प्रयोग आहे.

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या स्टार्टअपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार राजूमामा भोळे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, पुणे लोकमत संपादक संजय आवटे, जैन उद्योग समूहाचे मीडिया प्रमुख अनिल जोशी, संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

न्यूज पोर्टल चालविणे होणार सोपे
डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात काम करतांना आपल्याला भेडसविणारी मोठी अडचण म्हणजे स्किल मॅनपॉवर अर्थात कुशल मनुष्यबळ. लिखाणाचे उत्तम ज्ञान असणाऱ्या व्यक्तीस त्याच्या अनुभवाप्रमाणे चांगला पगार अथवा मानधन देवूनही आपणास योग्य व्यक्ती मिळत नाही. यामुळे ‘आहे त्या’ मनुष्यबळावर काम करतांना डिजिटल पोर्टलवर राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील बातम्या अपलोड करतांना त्यात कॉपी-पेस्टचे प्रमाण अधिक असते. यामुळे गुगल रँकिंग न मिळणे, रेव्हून्यू कमी होणे किंवा कॉपी राईटचे इश्यू येणे, या समस्या येतात. या समस्येवर तोडगा काढत कंटेंट ओशन इन्फोटेक प्रा. लि. या कंपनीने माय एआय रिपोर्टर ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित संगणकिय प्रणाली आज लाँच केली. या बद्दलची अधिक माहिती www.myaireporter.com वर उपलब्ध आहे.








