जळगाव जिल्हा

पितृपक्षात कडक उन्हाऐवजी अवकाळीचा पिच्छा!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

erandol news- जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । दरवर्षी पितृपक्षात उन्हाळ्यासारखे कडक ऊन जाणवते, मात्र यावर्षी उन्हाच्या तीव्रते ऐवजी पावसाळी वातावरण तयार झालेले आहे. रोज पाऊस हजेरी लावत असल्यामुळे पावसाळा सुरू झाल्यासारखे चित्र दिसून येते आहे. वास्तविक पावसाच्या परतीचे दिवस असताना सर्वत्र चिखलगारा पाण्याची डबकी वातावरणात गारठा असे दृश्य पहावयास मिळते आहे. सतत’च्या’ पावसामुळे अंजनी धरण पूर्ण पाण्याने भरल्याची गुड न्यूज आहे, तर दुसऱ्या बाजूला गेल्या चार-पाच दिवसापासून मुसळधार पाऊस हजेरी लावत असल्याने मे महिन्याची लागवड असलेल्या कपाशी पिकाचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत, यावर्षी कपाशीला चांगला भाव असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असताना पावसाचे असे चित्र राहिले तर कपाशी पिकाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एरंडोल तालुक्यात सतत होणाऱ्या मुसळधारेमुळे मे महिन्यात लागवड झालेल्या कपाशी पिकाच्या कैऱ्या पावसाच्या पाण्याने सडू लागल्या आहेत तसेच फुल फुगडी गळून पडत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याच्या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत तोंडाशी आलेला घास वाया जाईल की काय ? कपाशी पिकावर पावसाचे पाणी फिरणारका का ? कपाशीला भाव चांगला असताना उत्पादन कमी होईल की काय ? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहेत म्हणून आता पावसाने पिच्छा न पुरविता परतीच्या प्रवासाला जावे अशी अपेक्षा बळीराजाच्या वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

“अंजनी” चा अंशत: दरवाजा उघडला
अंजनी धरण क्षेत्रात मंगळवारी १३ सप्टेंबर रोजी दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अंजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली. धरण क्षेत्रात ५५ मिलिमीटर जलधारा बरसल्या त्यामुळे एकाच दिवसात अंजनी धरणात ११% पाणीसाठा वाढला. धरणात ९५.११% एवढा पूर्ण क्षमतेने जलसाठा झाला त्यामुळे बुधवारी पहाटे दोन वाजेपासून अंजनी धरणाचे एक गेट एका इंचाने उघडण्यात आले व ३३ क्युसेक पाणी प्रवाह नदी पात्रात सोडण्यात आला. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास अंजनी नदीचा पाणी प्रवाह अधिक वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर अंजनी नदीच्या काठावरील गावातील ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन गिरणा पाटबंधारे उपविभागीय अधिकारी एस. आर. पाटील व एरंडोल नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे.

१९ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन
एरंडोल येथे तहसील कार्यालयात १९ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी नागरिकांनी आपल्या काही तक्रारी अर्ज असल्यास यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Back to top button