⁠ 
बुधवार, एप्रिल 17, 2024

जळगाव पोलीस दलात ६५ VIP पोलीस, १२ वर्षांपासून एकाच उपविभागात सेवेत

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२२ । पोलीस दलाच्या एकाच उपविभागात १२ वर्षांपेक्षा जास्त वेळ नियुक्ती राहू शकत नाही, असा शासन नियम आहे. मात्र जिल्ह्यात तब्बल ६५ पोलीस कर्मचारी १२ ते २३ वर्षांपर्यंत एकाच विभागात ठाण मांडून बसलेले असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे शिस्तीचा विभाग म्हणून मानल्या जाणाऱ्या पोलीस दलातच, विभागातच बेकायदेशीर कामे, नियुक्त्या होतात की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. माहिती अधिकार कार्यकारी दिपककुमार गुप्ता यांनी ही माहिती समोर आणली आहे.

जिल्हा पोलिस दलात जळगाव, चोपडा, अमळनेर, पाचोरा. चाळीसगाव, मुक्ताईनगर, फैजपूर असे उपविभाग आहेत. तर सुमारे ३ हजार ४०० पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना एका विभागात १२ वर्षे नियुक्ती मिळते. यानंतर नियमानुसार त्यांना दुसऱ्या विभागात बदली द्यावी लागते; परंतु जिल्हा पोलिस दलातील ६५ कर्मचारी १२ ते २३ वर्षापर्यंत एकाच विभागात ठाण मांडून बसलेले आहेत. यातील अनेकांची निवृत्ती सात महिने, वर्षभरावर आली आहे. म्हणजेच आयुष्यातील अर्धी सेवा त्यांनी एकाच विभागात केल्याचे यातून उघड होते आहे. अधिकाऱ्यांकडून या कर्मचाऱ्यांवर कशासाठी ‘कृपा’ केली जाते याचे कारण समोर आलेले नाही.

एका पोलिस ठाण्यात किमान पाच वर्षे सेवा देता येते. यानंतर दुसऱ्या ठाण्यात बदली देण्यात येते. या नियमानुसार एकाच उपविभागात एकापेक्षा जास्त पोलिस ठाण्यात किमान १२ वर्षे थांबता येते. त्यांनतर विभाग बदलावा लागतो; परंतु जिल्हा पोलीस दलात सोयीनुसार बदल्या होतात. पोलीस ठाण्यात काही वर्षे काढल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, वाहतूक शाखा या साइड ब्रांचमध्ये कर्मचारी बदली करून घेतात. यांनतर पुन्हा हव्या असलेल्या पोलीस ठाण्यात बदली घेतात. परंतु साईड ब्रांचमध्ये केलेली नोकरीदेखील या वर्षाच्या कालावधीत मोजली जावी, असा शासन नियम आहे. यानंतर विभाग बदलावा लागतो; परंतु जिल्हा पोलिस दलात सोयीनुसार कालावधीत मोजली जावी, असा शासन नियम आहे; परंतु जिल्हा पोलिस दलाचे याकडे दुर्लक्ष होतेय.

जळगाव शहरातील सहा पोलिस ठाण्यातील २७ कर्मचारी अशाचप्रकारे वर्षानुवर्षापासून ठाण मांडून बसलेले आहेत. यात सर्वाधिक जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिस ठाण्यात प्रत्येकी सात कर्मचारी असल्याचे समोर आले आहे. त्या खालोखाल जळगाव तालुका, रामानंदनगर व शहर पोलिस ठाण्यात प्रत्येकी चार तर शनिपेठ पोलिस ठाण्यात एक कर्मचारी आहे.