जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२६ । जळगावातून महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेची ई केवायसी (KYC) करून देण्याच्या नावाखाली महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ रमेश चव्हाण (वय ३८) हा ऑनलाइन सेवा केंद्र चालवत होता. लाडकी बहीण’ योजनेचे केवायसी करण्याच्या बहाण्याने तो महिलांच्या संपर्कात येत असे. याच दरम्यान, ‘तुमच्या योजनेचे केवायसी करायची आहे’ असे सांगून चव्हाण एका महिलेच्या घरी गेला. घरी जाऊन कागदपत्रांची पडताळणी करताना त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप आहे.

चव्हाण इतक्यावर थांबला नाही. तर त्याने एका महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणीही केली होती. चव्हाण याने दुसऱ्या एका महिलेला तिचे बंद पडलेले ‘निवृत्ती वेतन’ पुन्हा सुरू करून देण्याचे आमिष दाखवले. त्या बदल्यात त्याने तिच्याकडे प्रेमसंबंधाची मागणी केल्याचेही पोलीस फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच संशयित आरोपी गोकुळ चव्हाण फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.









