उद्योजकांना ब्लॅकमेल केल्यास गाठ पोलिसांशी! जळगावात उद्योजकांच्या बैठकीत पोलीस अधीक्षकांच्या कडक इशारा

मे 20, 2026 3:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहराच्या आर्थिक व औद्योगिक विकासासाठी सुरक्षित, शिस्तबद्ध आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. जळगाव एमआयडीसी परिसरातील औद्योगिक सुरक्षा, गुन्हे प्रतिबंध आणि वाहतूक सुरक्षेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक आणि कारखानदारांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्योगांना ब्लॅकमेलिंग किंवा दबावतंत्राद्वारे त्रास देणाऱ्या प्रवृत्तींना खपवून घेतले जाणार नाही, असा कडक आणि स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला.

udyogmetting

सदर बैठकीमध्ये औद्योगिक परिसरातील वाढत्या सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः कारखान्यांमध्ये चोरीच्या घटना टाळण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, प्रशिक्षित सुरक्षा रक्षक (वॉचमन) नेमणे, कारखाना परिसरास मजबूत कंपाउंड वॉल उभारणे, प्रवेश व निर्गमन नियंत्रण प्रणाली राबविणे याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच औद्योगिक परिसरात होणारे वाहतूक अपघात व औद्योगिक दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे, कामगारांना सुरक्षा प्रशिक्षण देणे, अग्निसुरक्षा उपाययोजना अद्ययावत ठेवणे यावर भर देण्यात आला.

महाराष्ट्रातील काही औद्योगिक भागांमध्ये अमली पदार्थांच्या हालचाली व वापराच्या घटना आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव एमआयडीसी परिसरातही याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. संशयास्पद हालचाली, अनोळखी व्यक्ती किंवा बेकायदेशीर प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले.

औद्योगिक परिसरात कोणतेही आंदोलन, मोर्चा किंवा संघटनात्मक हालचाली होणार असल्यास त्याची माहिती आगाऊ स्वरूपात पोलिस प्रशासनास देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले. उद्योगांना ब्लॅकमेलिंग किंवा दबावतंत्राद्वारे त्रास देण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला. जळगाव शहराच्या आर्थिक व औद्योगिक विकासासाठी सुरक्षित, शिस्तबद्ध व भयमुक्त औद्योगिक वातावरण अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. एमआयडीसी परिसरातील अतिक्रमणांना वेळेत प्रतिबंध करणे, सर्व कामगारांचे चारित्र्य पडताळणी करणे तसेच प्राणघातक रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांसाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय रात्रीच्या गस्तीसाठी एमआयडीसी प्रशासनाने वाहन उपलब्ध करून दिल्यास पोलिस प्रशासनाकडून सशस्त्र पोलिस कर्मचाऱ्यांसह प्रभावी नाईट पेट्रोलिंग व्यवस्था उभारण्यात येईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

पोलीस प्रशासनाच्या वतीने ही बैठक प्रतिबंधात्मक व जनजागृतीपर उपक्रमाचा भाग असून, उद्योग क्षेत्र आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय वाढवून सुरक्षित व गुन्हेमुक्त औद्योगिक वातावरण निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीस एमआयडीसी परिसरातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी, उद्योजक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now