मान्सूनची तळकोकणात एन्ट्री; पण राज्य सरकारच्या नव्या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता वाढली; वाचा काय आहे?

जून 7, 2026 5:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यंदा मान्सून वेळेपूर्वी दाखल होणार या अंदाजावर विसंबून राहिलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला, तरी पुढील काही दिवस त्याचा वेग कमालीचा मंदावणार आहे. परिणामी, किमान १५ जूनपर्यंत राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता कमी असल्याचा अधिकृत अंदाज राज्य सरकारने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून शेतकऱ्यांना आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई न करण्याचे महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे.

rain 1

कोकणात पाऊस, पण राज्याची प्रगती खुंटली

मे महिन्याच्या अखेरीस केरळात आणि त्यानंतर लगेचच महाराष्ट्रात मान्सून धडकेल, हा हवामान विभागाचा अंदाज सपशेल चुकीचा ठरला आहे. यंदा मान्सून काहीसा उशिरानेच केरळात आणि त्यानंतर आता तळकोकणात दाखल झाला आहे. हवामान अंदाजानुसार, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. मात्र, त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी राहणार आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात केवळ ‘वादळी’ पाऊस

१५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर ढगाळ हवामान होऊन विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस व्यापक क्षेत्रावरील पेरण्यांसाठी अजिबात पोषक नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पेरणीसाठी आवश्यक असणारा मुख्य मान्सूनचा पाऊस येईपर्यंत शेतकऱ्यांनी वाट पाहणे गरजेचे आहे.

१२ जूनपर्यंत उष्णतेचा तडाखा कायम

पावसाचा जोर कमी असतानाच राज्यातील कमाल तापमान देखील उच्च पातळीवर राहणार आहे. किमान १२ जूनपर्यंत विदर्भ आणि खानदेशात तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात ते ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि अंगाची लाहीलाही तूर्तास कायम राहणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories