राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचे, हवामान खात्याकडून जळगावला अलर्ट जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२३ । राज्यात बदल असलेल्या हवामानामुळे शेतकरी संकटात आला आहे. राज्यातील काही भागात उन्हाचा पारा वाढत आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस धुमाकूळ घाल असल्याचे चित्र दिसून येतेय. दरम्यान, हवामान खात्याने राज्यात पुढील दिवस वादळी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

त्यानुसार आज मंगळवारी (ता. 11) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सोबतच जळगाव जिल्ह्याला देखील आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर 13 एप्रिलला जळगावला येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आणखी चिंता वाढणार आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्रामध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या पूरक स्थितीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.

हवामान विभागाने सांगितले आहे की, आज (ता. 11) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहून, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा इशारा आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी तापमानातही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आज येथे वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
आज नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव.या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान,गेल्या चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. अजूनही हे संकट संपलेले नाही. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 एप्रिलपर्यंत हे संकट कायम राहील.