⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

2 ते 3 दिवसांत राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता, IMD कडून अलर्ट जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । जुलै महिन्याच्या सुरवातीपासून राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अद्यापही राज्यातील काही ठिकाणी पाऊस कोसळत आहे. अशातच भारतीय हवामान खात्यानं येत्या 2 ते 3 दिवसांत राज्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पुढचे दोन दिवसात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.

सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोराचा पाऊस होताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. तसेच लातूर, औरंगाबाद, जिल्ह्यातही पावसानं धुमाकूळ घातला आहे. अशातच राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मात्र या दरम्यान, मुंबई ठाणे भागात तीव्र हवामानाचे इशारे नाहीत.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी जळगाव शहरासह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पाऊण तासातच २० मि.मी. इतका पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागातील रस्ते जलमय झाले हाेते. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. त्यात काही ठिकाणी अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. अशातच शहरासह जिल्ह्यात पुढील दाेन दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.