शेतकऱ्यांची चिंता वाढणार? ‘या’ राज्यांमध्ये IMD कडून पावसाचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । देशातील हवामानाचे स्वरूप सतत बदलत आहे. देशातून मान्सूनने बाय-बाय करताच उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीने दार ठोठावले आहे. उत्तराखंड आणि हिमाचल या डोंगराळ राज्यांमध्ये पाऊस आणि हलक्या हिमवृष्टीमुळे काहीशी बोचरी थंडी पडू लागली आहे. दरम्यान, देशातील काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा हवामान खात्यांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढू शकते.

2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल आणि केरळमध्ये पाऊस पडू शकतो, असा हवामान खात्याचा इशारा आहे. ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान पश्चिम हिमालयीन भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच बर्फवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. पंजाबमध्ये ५ आणि ६ नोव्हेंबरला पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानाची माहिती देणाऱ्या स्कायमेट या खाजगी कंपनीच्या हवामान अपडेटनुसार उत्तराखंड राज्यातील काही भागात पावसासोबत हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाचा इशारा
देशातील उत्तरेकडून दक्षिणेकडे जवळपास सर्वच राज्यांमध्ये हवामानाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. मैदानी भागात तापमानात घट झाली आहे, तर डोंगराळ भागात बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पाऊस आणि ढगांच्या गडगडाटाच्या हालचाली दिसत आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बोचरी थंडी पडू लागली आहे. जळगाव जिल्ह्यात आगामी आठवड्यापासून थंडीचा जोर पुन्हा वाढेल.