शनिवार, डिसेंबर 2, 2023

गुडन्यूज..! अखेर मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, IMD ची घोषणा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२३ । मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच मान्सूनने (Monsoon) आज संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. भारतीय हवामान विभागानं याबाबतची घोषणा केली आहे.

काय आहे हवामान खात्याचा अंदाज?
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला असून गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मिरात पुढील दोन दिवसात मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. सध्या राज्याच्या काही भागात पाऊस कोसळत आहे. अद्याप काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

यंदा मान्सून केरळात ८ जून रोजी दाखल झाला. त्यानंतर तीनच दिवसात म्हणजेच ११ जून रोजी मान्सून राज्यात दाखल झाला होता. मात्र चक्रीवादळामुळे मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहे. २३ जून रोजी मान्सून राज्यातील काही ठिकाणी दाखल झाला होता. त्याच्या ४८ तासातच मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापलं आहे.

दरम्यान, मुंबई, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, यासह विविध जिल्ह्यात पावसानं पावसाने धुव्वाधार बॅटिंग केली. मुंबईत आज सकाळपासूनचं पावसाचा जोर सुरू होता. दरम्यान, मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पुढचे ५ दिवस सक्रिय राहणार आहे.

राज्यासाठी पुढील २४ तास धोक्याचे
पुढील पाच दिवसांत कुठे कुठे पाऊस असणार आहे, त्याची माहिती हवामान विभागाने दिली. त्यानुसार कोकण अन् विदर्भात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस (Rain Alert) पडणार आहे. मध्य महाराष्ट्र अन् मराठवाडामध्ये ही पावसाचा जोर कायम असणार आहे. मुंबई पुणे, रायगड सातारा, नाशिकमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.