जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२४ । राज्यात मान्सून पुन्हा पूर्णपणे सक्रिय झाला असून काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान खात्याने आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील आजपासून दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जळगावात मुसळधारचा इशारा इशारा
जिल्ह्यात अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहेत. अशातच बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने २० ते २१ जुलैपर्यंत हे क्षेत्र तीव्रतेने पुढे सरकणार आहे. त्यामुळे रविवारी जिल्ह्यातील सातपुडा व उत्तरेच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जळगाव जिल्ह्याला आज शनिवारी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जळगाव तालुक्यासह भुसावळ, जामनेर, चोपडा या तीन तालुक्यांत २५ ते ३५ मिमी पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यांसह सातपुड्याच्या पट्टयात ६० ते ९० मिमीपर्यंत पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
पाऊस पुन्हा घेणार आठवडाभराचा ‘ब्रेक’..
दरम्यान, रविवारी बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या प्रणालीमुळे पाऊस होऊ शकतो. मात्र, त्यानंतर २२ ते २८ जुलैदरम्यान जिल्ह्यात पावसाचा ब्रेक राहण्याचा अंदाज आहे.
आज या जिल्ह्यांना अलर्ट
हवामान खात्याने आज कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, नगर, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील नांदेड वगळता सर्वच जिल्हे, विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यातील रत्नागिरी आणि विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे.