⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

आजाराने आवाज तर कर्करोगाने नवरा हिरावला, दिराने आधार देत संसार फुलवला

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । अनेक व्यक्तींच्या आयुष्यात काही अश्या घटना घडतात. ज्यामुळे अख्ख आयुष्य उद्ध्वस्त होऊन जात. पण आयुष्यात दुःख असेल, तर सुखाची किनार नक्कीच असते. कर्करोगाने पती गमावलेल्या मूकबधिर वहिनीला आधार देण्याचे काम सख्ख्या दिराने केले. एवढेच नव्हे, तर भावाच्या दोन मुलींचे पालकत्वदेखील मोठ्या आनंदाने स्वीकारले. स्वाती व संजय यांचा विवाह शनिवारी, सुरतमध्ये पार पडला. या विवाह सोहळ्याने समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

स्वाती सुरेश काटे मूळची फैजपूरची. आजारपणात तिचा आवाज गेला, बहिरेपण आले. मूकबधिर म्हणून शिक्का बसला. लग्नाचे वय झाले तेव्हा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता, मुलीचे जमायचे कसे? मुलीचे वडील हयात नव्हते. त्यावेळी स्वातीच्या सख्ख्या आतेभावांनी प्रस्ताव दिला ‘आमच्यातील तिघांपैकी ज्याला स्वाती वरेल त्याच्याशी तिचे लग्न होईल. मामाची मुलगी आपल्या घरात आली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. स्वातीने गणेश प्रकाश चित्ते (सुरत) यांना वरले. या दोघांचे लग्न झाले. या दाम्पत्याला दोन मुली झाल्या. दुर्दैवाने कर्करागाचे निदान झाले. चित्ते कुटुंबाने उपचारांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु, चार महिन्यांपूर्वी गणेश यांचे निधन झाले.

काही दिवसांनी काटे कुटुंबाचे नातेवाईक रमेश म्हसकर व दिलीप काटे यांनी स्वातीच्या पुनर्विवाहाचा विचार तिची आई सविता आणि भाऊ नितीन व दीपक यांच्याजवळ बोलून दाखविला. स्वातीचा दीर संजय यांचे लग्न बाकी होते. त्याच्या पालकांकडे विचारणा करण्यात आली. त्यांनी तयारी दाखविली. स्वातीकडून होकार आल्यावर संजय यांच्याशी लग्नाचे ठरले आणि शनिवारी, सुरतमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.