दीपस्तंभ मनोबल संस्थेला भेट देत विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
जळगाव लाईव्ह न्यूज । दीपस्तंभ फाऊंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकल्पासाठी दि. ७ जुलै हा दिवस अत्यंत अभिमानाचा ठरला. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जळगाव दौऱ्यादरम्यान आदरणीय यजुर्वेंद्र महाजन तसेच संस्थेच्या आग्रहपूर्ण निमंत्रणाचा मान राखत ‘मनोबल’ प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान गवई यांनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली. कला व कौशल्य विभागात दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक व दर्जेदार हस्तकला वस्तुंचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच संस्थेतील दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधत शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी गवई यांनी ‘मनोबल’शी निगडित असलेल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे त्यांनी मनापासून कौतुक करत त्यांच्या कलागुणांना दाद दिली.
कार्यक्रमास जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी विनय गोसावी तसेच पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक मा. परेशभाई शाह व मा. राजेंद्र पाटील यांच्या हस्ते, मा. भूषण गवई यांचा मानपत्र व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तुंनी यथोचित सन्मान करण्यात आला. यामुळे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक दिशा मिळाली.
भूषण गवई यांच्या या सदिच्छा भेटीमुळे विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली असून दीपस्तंभ फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याला निश्चितच नवी ऊर्जा व बळ प्राप्त झाले आहे.











