जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२६ । जळगाव जिल्हावासीयांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून जळगावसह नाशिक जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. गिरणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याचा येवा प्रचंड वाढला आहे.

अवघ्या २४ तासांत जलसाठ्यात मोठी झेप
बुधवारी सकाळी गिरणा धरणात अवघा २७.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता, मात्र, नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या धुवांधार पावसामुळे गेल्या २४ तासांत परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज सकाळी धरणाचा जलसाठा थेट ३५.२४ टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या एका दिवसात धरणात तब्बल ८ टक्क्यांहून अधिक नवीन पाण्याची आवक झाली आहे.

अर्ध्या जळगाव जिल्ह्याची तहान भागणार!
गिरणा धरण हे जळगाव जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. या धरणावर अर्ध्या जळगाव जिल्ह्याची तहान अवलंबून आहे. गेल्या महिन्यात गिरणेचा जलसाठा २२ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. मात्र जुलैच्या सुरुवातीलाच धरणाची पाणीपातळी ३५ टक्क्यांच्या पार गेल्यामुळे चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल यांसह गिरणा काठच्या शेकडो गावांचा आणि जळगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्तास मिटला आहे.
पाण्याचा ओघ अजूनही सुरूच असल्याने येत्या काही दिवसांत धरणाच्या पाणीपातळीत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दिलासादायक चित्रामुळे खान्देशातील शेतकरी वर्गात कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.







