⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

उद्धव ठाकरे स्पष्ट म्हणाले.. समोर येऊन सांगा, मी मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुखपदाचा राजीनामा देतो!

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । मला माझ्या लोकांनी सांगितले असते की, तुम्ही मला मुख्यमंत्री म्हणून नको, तुम्ही नालायक आहेत तर मी या क्षणाला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन. अशी भावनिक साध उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना घातली. याच बरोबर ते शिवसैनिकांना देखील भावनिक साद घालत म्हणाले कि, जर तुम्हाला पक्षप्रमुख नको असे वाटत असेल तर स्पष्टपणे सांगा मी त्याचाही राजीनामा देतो, असेही ते म्हणाले.

गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री म्हणाले कि, मी काही वेगळे मुद्दे घेऊन आज तुमच्यासमोर आलो आहे. माझी शस्त्रक्रिया झालेली असल्याने पुढील २-३ महिने फार विचित्र होते म्हणून मी भेटत नव्हतो. मी पहिली बैठक रुग्णालयातून केली होती. मी भेटत नसलो तरी कामे थांबली असे कुठेच झाले नाही. बरा झाल्यावर मी भेटीगाठी सुरु केल्या. बैठकींना हजेरी लावली. काही लोक असे म्हणत आहेत कि शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे. मुख्यत्वे हिंदुत्व हे स्व.बाळासाहेबांपासून शिवसेनेशी जुळलेले आहे. शिवसेना कदापि हिंदुत्वपासून वेगळे होऊ शकत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि, काही जण असे ठासविण्याचा प्रयत्न करीत आहेत की आज बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. अगोदर जी शिवसेना होती आजही तीच शिवसेना कायम आहे. मी प्रतिकूल परिस्थितीत ५६ आमदार निवडून आणले. मी कोणतेही काम जिद्दीने करीत असतो. मला कोणताही अनुभव नसताना मी निवडणुकीत उतरलो आणि सर्व अनुभव घेत यशस्वी केले. प्रतिकूल परिस्थिती असल्याने आजवर ज्यांच्या विरोधात लढलो त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत एकत्र आलो. सर्व ठरल्यावर शरद पवार मला एका वेगळ्या खोलीत घेऊन गेले आणि मला जबाबदारी घेण्याचे सांगितले. महापौर निवड झाल्यावर अभिनंदन करायला जाणारा मी, असा कोणताही अनुभव नसताना कशी जबाबदारी घेणार अशी मी त्यांना विचारणा केली. आमच्या पक्षात काही जेष्ठ नेते असून त्यांचे म्हणणे असल्याने तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल असे ते म्हणाले म्हणून मी ते स्वीकारले.
हेही वाचा : महाराष्ट्र विधानसभा बरखास्त होऊ शकते का? संवैधानिकदृष्ट्या या आहेत शक्यता

गेल्या दोन दिवसापासून ज्या घडामोडी घडत आहे त्यावर मला फारसे बोलायचे नाही. मुख्यमंत्री काम करीत नाही. मुख्यमंत्री आम्हाला नको आहे असे कुणी म्हणत आहे. मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे पण आमच्या लोकांनी मला समोर येऊन सांगायला हवे. माझ्यासमोर बसून जरी कुणी असे म्हणाले असते तर मला चालले असते. सुरत आणि इतर कुठे जाऊन सांगण्याची आवश्यकता नव्हती. आजही त्यांच्यापैकी कुणी समोर आले तर मी माझा राजीनामा देण्यास तयार आहे. आणि जर आमच्या शिवसैनिकांना देखील असे वाटत असेल कि पक्षप्रमुख म्हणून मी नको तर त्यांनी देखील तसे सांगावे मी पदाचा राजीनामा देतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्पष्ट म्हणाले.

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि, आज फेसबुक लाईव्ह संपल्यावर मी वर्षा बंगला सोडून माझा मुक्काम मातोश्रीवर हलवेल. मला पदाचा कोणताही मोह नाही. मी माझा राजीनामा लिहून ठेवतो आहे. आमच्या लोकांपैकी कुणीही समोर यावे किंवा फेसबुक लाईव्ह संपल्यावर फोन करावा आणि माझा राजीनामा राज्यपालांकडे घेऊन जावे. आज माझा कुठेही आगतिकपणा नाही, लाचारी नाही, मजबुरी तर मुळीच नाही. सत्तेत नसताना देखील असे अनेक प्रसंग आले आहेत. शिवसैनिकांच्या बळावर त्याला उत्तर दिले आहे. मी मुख्यमंत्री नको, पक्षप्रमुख नको असे माझ्या लोकांनी म्हटले तर चालेल पण मला समोर येऊन सांगायला हवे. संख्या कुणाकडे किती हा विषय माझ्यासाठी गौण आहे. लोकशाहीत ज्याच्याकडे जास्त संख्या तो मोठा असतो. माझ्यानंतर पुढे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास मला आनंद असेल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.