जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील निमखेडी गावामधून खुनाची खळबळ उडवून देणारी घटना समोर आलीय. येथे कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी दुपारी घडली. दिपाली नितीन सोनवणे (वय २८, रा. निमखेडी, ता. जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेनं जळगावात खळबळ उडाली.

प्राप्त माहितीनुसार, नितीन विजय सोनवणे हा आरोपी मयत महिला दिपाली सोनवणे आणि आपली दोन मुलं व एक मुलगी यांच्यासोबत निमखेडी गावात राहत होता. नितीन सोनवणे हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मागील काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये सतत कौटुंबिक वाद सुरू होते. गुरुवारी दुपारी पुन्हा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाच्या भरात संतापलेल्या नितीन सोनवणे याने लोखंडी विळ्याने पत्नीच्या मानेवर व पोटावर वार केले. या हल्ल्यात दिपाली सोनवणे गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी नितीन सोनवणे हा स्वतःहून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. मृत महिलेच्या पश्चात दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार असून, या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.








